केंद्रस्तरीय क्रीडा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा संपन्न

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा चिरनेर येथील राजिप प्राथमिक केंद्र शाळा व मोठीजुई येथील राजिप आदर्श शाळेत दि.16 व 17 डिसेंबर रोजी पार पडल्या.

चिरनेर येथील पहिल्या दिवसाच्या स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच सचिन घबाडी, निवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी श्रीधर मोकल, केंद्रप्रमुख अविनाश नवाळे, मुख्याध्यापक विश्‍वनाथ गावंड, अशोक कांबळे, सचिन म्हात्रे, गौरवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच भास्कर मोकल यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रस्तरीय स्पर्धेत, चिरनेर केंद्रात येणार्‍या 12 प्राथमिक शाळांनी भाग घेतला होता. यात सांघिक नृत्य स्पर्धेत चिरनेरमधील चांदायली आदिवासीवाडी प्राथमिक शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तर, प्राथमिक केंद्र शाळेने सांघिक नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच, समूहगीत स्पर्धेत प्राथमिक केंद्र शाळा प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे. पथनाट्य स्पर्धेतही प्राथमिक केंद्र शाळेने प्रथम क्रमांकाचेच पारितोषिक पटकाविले आहे. तर, शाडू मातीपासून शिल्प तयार करण्याच्या स्पर्धेत चिरनेर प्राथमिक केंद्र शाळेचे विद्यार्थी साई मोकल (प्रथम) व जिज्ञा पिचड (द्वितीय) क्रमांकांनी विजयी झाले आहेत.

Exit mobile version