श्रीलंका दौरा : राहुल द्रविड प्रशिक्षक


सौरव गांगुलीने केले जाहीर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जुलै महिन्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू 14 दिवसांसाठी मुंबईत विलगिकरणात राहतील. या दौर्‍यासाठी निवडलेल्या संघावरून बरीच चर्चा सुरू आहे, जयदेव उनाडकट व राहुल टेवाटिया यांना वगळल्याने टीकेचा सूर घुमत आहे. अशात या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी महान फलंदाज राहुल द्रविड याच्या खांद्यावर सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मौन सोडले असून राहुल द्रविडच प्रशिक्षक असेल यावर त्यान शिक्कामोर्तब केले. आता अधिकृतरित्या द्रविडच या दौर्‍यावर टीम इंडियाला मार्गदर्शन करणार, हे निश्‍चित झाले आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वात जुलैमध्ये श्रीलंका दौरा करणारा संघ जाहीर करण्यात आला. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ आधीच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तब्बल 25 वर्षानंतर बीसीसीआयने क्रिकेट विश्‍वावर पुन्हा वर्चस्व गाजविले आहे. इतिहासात डोकावले तर भारताने 1998 ला देखील असेच दोन संघ पाठविल्याचे उदाहरण डोळ्यापुढे येते. भारताचा मूळ संघ पाकिस्तानविरुद्ध कॅनडात सहारा चषक खेळला, त्याचवेळी दुसरा संघ क्लालालम्पूर येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता.

गांगुलीनं सांगितले की, ‘श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियाला राहुल द्रविड मार्गदर्शन करेल.’ सूत्रांच्या माहितीनुसार राहुल द्रविडसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करणारी टीमच श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे.

Exit mobile version