। मुरूड । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यात गणेश मूर्ती तयार करण्याचे असंख्य कारखाने आहेत. लोकांना सुबक मूर्ती करून देत असताना मूर्तिकारांचे काही गहन प्रश्न असून ते शासनाकडून सोडून घेण्यासाठी मुरुड तालुक्यातील सर्व श्री गणेश मूर्तिकार एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. शहरातील भंडारी बोर्डिंगच्या सभागृहात सर्व मूर्तिकार एकत्र येऊन त्यांनी आपली कार्यकारिणी निवडली आहे. मुरूड तालुका श्री गणेश मूर्तिकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत सुर्वे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष म्हणून मजगावचे सुप्रसिद्ध मूर्तिकार चंद्रकांत बुल्लू यांची निवड करण्यात आली आहे.सचिव संदीप मोकल, सह सचिव भार्गव कोटकर, खजिनदार विशाल पाटील, उप खजिनदार वैभव पाटील, सल्लागार म्हणून नथुराम तांबडकर, शैलेश रातवडकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, श्री गणेश मूर्तिकारांच्या समस्या शासनाकडून सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गणेशमूर्ती तयार करताना प्रमुख अडचण जागेची येते. यासाठी एखादा कारखानदार ग्रामीण अथवा शहरात राहत असेल तर त्या प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचप्रमाणे कारखानदारांना बँकेने कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिली पाहिजे. काही वेळा अतिवृष्टीमुळे कारखानदारांचे मोठे नुकसान होते. यासाठी शासनाने भरपाई मिळवून देण्यासाठी संघटना योग्य तो पाठपुरावा करणार आहे. त्याचप्रमाणे महावितरणने गणपती सणाच्या एक महिना अगोदर वीज जाता कामा नये, या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सुर्वे यांनी सांगितले.





