| रसायनी | वार्ताहर |
चौक येथील श्रीस्वामिनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेतर्फे झालेल्या गुरुकुल ऑलिम्पिक 2023 विविध क्रीडा स्पर्धेत श्रीस्वामिनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळा नवी मुंबई यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर, द्वितीय क्रमांकावर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल लोधिवलीने आपलं नाव कोरलं. या स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कुल न्यू पनवेल, रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधिवली, जी.जे.एम. इंग्लिश मीडियम खालापूर, रिलायन्स फाऊंडेशन इंग्लिश माध्यम स्कूल लोधिवली, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल लोधिवली, हिमांशू दिलीप पाटील स्कूल नढाळ, नॅशनल पब्लिक स्कूल खोपोली, श्रीस्वामिनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय नवी मुंबई स्कूल आणि सेंट विन्सेंट पीलोटी स्कूल रिसवाडी या शाळांनी सहभाग नोंदवला.
दोन दिवस चाललेल्या या सर्धेत विविध खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघांचा आणि खेळाडूंचा सत्कार करून आकर्षक चषक व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्रीस्वामिनारायण गुरुकुल शाळेत पार पडला. या सोहळ्यात गुरुकुलमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विष्णूदेवाचं दहा अवतार धारण केले होते. हा बक्षीस वितरण समारंभ उद्योजक राणाभाई राजपूत व रिलायन्स फाऊंडेशन शाळेचे उपमुख्याध्यापक सुहास सबनीस तसेच श्रीस्वामिनारायण गुरुकुल नवी मुंबईचे संचालक परमपूज्य विश्वमंगलदास स्वामीजी, ब्रम्हस्वरूप स्वामीजी व गुरुकुलचे मुख्याध्यापक डॉ.पी. हरिबाबू रेड्डी यांच्या उपस्थितीत पार पडला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुरुकुल शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.