श्रीवर्धनकरांना भैरवनाथाच्या मंदिराची प्रतीक्षा

निधी असूनही बांधकामाला सुरूवात नाही


| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे जगप्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ. याच ठिकाणी श्रीसिद्धनाथ भैरव व श्रीकेदारनाथ भैरव ही दोन मंदिरे आहेत. या मंदिरांच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी बत्तीस लाखांचा निधी असून, अद्याप मंदिर बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे भैरवनाथा तुझं मंदिर कधी होणार, अशी विचारणा जनमानसातून केली जात आहे. दिवेआगर येथील सुवर्णगणेश मंदिर, रूपनारायण, पंचमुखी महादेव, उत्तरेश्वर पंचमुखी यांच्याप्रमाणे श्रीसिद्धनाथ व श्रीकेदारनाथ या मंदिरांनादेखील वैभवसंपन्न असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या मंदिराच्या नूतनीकरणाने कोकणातील विकासाला चालना मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यात कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, या कामाला या-त्या कारणाने चालढकलपणा होत असून, सोबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचादेखील अभाव असल्याने बांधकामाचा श्रीगणेशा झालाच नाही.

भैरवनाथाची यात्रा एप्रिल महिन्यात येत असल्याने मंदिरांच्या नूतनीकरणाला सुरुवात होऊन कामाला गती मिळावी आणि येणाऱ्या यात्रेपर्यंत काम पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मंदिर नूतनीकरण कामाची वर्कऑर्डर झाली आहे. त्याप्रमाणे लवकरच कामाला सुरुवात होईल.

तुषार लुंगे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन

कंत्राटदाराकडून मंदिराच प्लॅन तयार करण्यात येईल. तसे ते संबंधितांच्या समोर मांडले जाईल व मंदिरांच्या बांधकामाला सुरुवात होईल.

रविकांत गेडाम, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन.
Exit mobile version