SSC – HSC परीक्षा ऑफलाईनच; राज्य मंडळाचा ठाम निर्णय

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील दहावी- बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाईन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होईल. बुधवारी (ता.२) राज्य शिक्षण मंडळाची विभागीय मंडळांसमवेत ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत दहावी बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई, नागपूर, पुणे आदी शहरात ‘परीक्षा पुढे ढकला अन्यथा ऑनलाइन घ्या’, म्हणत विद्यार्थी रस्त्यावर आले होते. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घ्यावी असा एक मतप्रवाह तयार झाला होता. मात्र यावर बोर्डाने ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुरुवारी (ता.३) पुण्यातही बोर्डाने दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, या मध्ये परीक्षेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे.

Exit mobile version