दोघे गंभीर जखमी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत येथून चौककडे जाणाऱ्या एर्टिगा जीप गाडीला समोरून येणाऱ्या एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात जीपमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात एसटी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे कर्जत-चौक रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
वांगणी ठाणे येथील रिंकू सिंग हे आपली एमएच 05, ईए 5713 ही इर्टिका जीप घेऊन कल्याण-कर्जत रस्त्याने चौककडे जात होते. साधारण पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कर्जत एसटी आगाराची पनवेल येथून कर्जतकडे येणारी एम एच 20 बी एल 3625 ही एसटी बस समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना इर्टिका गाडीवर जाऊन धडकली. हा अपघात इतका भयानक होता की, चालक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर बाजूला असलेली व्यक्तीही गंभीर जखमी झाली आहे. या दोघांना अडकलेल्या स्थितीतून बाहेर काढून तात्काळ डिकसल येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले आहे.
अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघातास कारणीभूत ठरलेला एसटी चालकावर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अपघातामुळे कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर साधारण एक तास वाहतूक कोंडी झाली होती.







