शासकीय कार्यक्रमामुळे एसटी बससेवा कोलमडली

ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल ; सोमवारी कोकणातून 700 बसेस मुंबईकडे रवाना होणार

| महाड | वार्ताहर |

मागील दोन महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील कुठे ना कुठे तरी शासकीय कार्यक्रम, ‌‘शासन आपल्या दारी’ तसेच विविध उद्घाटन समारंभ आदी नियोजित कार्यक्रमांमुळे गर्दी जमवण्यासाठी लोकप्रतिनिधी एसटी महामंडळाच्या गाड्यांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसटीची सेवा पूर्णतः कोलमडली असून, अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. परिणामी, सर्वसामान्य जनतेसह शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा आर्थिक भुर्दंड बसला असल्याने शासनाच्या धोरणाबद्दल तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून पोलादपूरपर्यंत असणाऱ्या 15 तालुक्यांत विविध शासकीय कार्यक्रम होत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा वापर करत विविध शासकीय कार्यक्रमांच्या माध्यामतून प्रचारावर भर दिला जात असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्वसामान्यांची व गोरगरीबांची जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे बघितले जाते. या एसटीतून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून एसटीचा शासकीय कार्यक्रमांसाठी अमर्याद वापर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीमार्फत चालविल्या गेल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्यांवर झाला आहे. परिणामी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शासनाच्या या भूमिकेबाबत लोकप्रतिनिधी व एसटी महामंडळाच्या भूमिकेबाबततीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

कोकणातून उद्या सातशे एसटी बसेस मुंबईकडे
मुंबईतील मुलुंड येथे कुणबी समाज विद्यार्थी वसतिगृहाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर कुणबी बांधवांना पाचारण करण्यात आले आहे. त्यासाठी किमान 700 एसटी बसेस मुंबई कुणबी बांधवांना घेऊन धडकणार आहेत. रायगडातून 66 बस जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना खासगी वाहनांमार्फत आपले घर गाठावे लागणार आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न
मुलुंड येथील कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोकणातल्या तीन जिल्ह्यातून 700 तर ठाणे व पालघर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस त्यांची संख्या देखील 200 च्या आसपास असल्याने उद्या मुंबईतील मुलुंड येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होणार आहे.
एसटीमधून प्रवास करणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनादेखील या अचानकपणे एसटीच्या फेऱ्या बंद झाल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने जनता शासनाच्या या धोरणाबद्दल तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
Exit mobile version