सुदैवाने जीवितहानी टळली; रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
| महाड | प्रतिनिधी |
महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ गुरुवारी दुपारी फौजी अंबवडे–मुंबई एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरून अपघातग्रस्त झाली. बसमध्ये पाच प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही.
दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई सेंट्रल आगाराची ही बस महाडच्या दिशेने येत असताना रस्त्यावरील साईडपट्टीवर घसरून रस्त्याच्या बाजूला गेली. घटनेनंतर काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली.
दरम्यान, महाड-दापोली राज्य मार्गावर पावसाळा सुरू होताच वाहन घसरण्याच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील वर्षी शिरगाव ते आंग्रे कोंड दरम्यान अशाच प्रकारचे अनेक अपघात घडले होते. यंदाही पावसाची सुरुवात होताच त्याच मार्गावर वाहन घसरण्याचे प्रकार सुरू झाल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
