एसटी फेर्‍या रद्द, प्रवाशांचे हाल

| अलिबाग । प्रतिनिधी ।

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रात निम्म्याहून अधिक एसटी बसेस पाठविण्यात आल्या. त्याचा फटका सोमवारी सकाळी व संध्याकाळी प्रवाशांना बसला. प्रवाशांना निश्‍चित स्थळी वेळेवर जाता आले नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे, महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिक व तरुणवर्गालाचा त्याचा फटका बसला.

रायगड लोकसभा मतदारसंघातील दोन हजार 185 मतदान केंद्रावर मतदान मंगळवारी होणार आहे. मतदार केंद्रात कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी 287 एसटी बसेस केंद्रात पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी कामावर जाणारे कर्मचारी, शिकवणीसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांसह दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एसटी फेर्‍या बंद झाल्याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे अनेकांनी एसटीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. सकाळपासून एसटी फेर्‍या बंद झाल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप झाला. तासन्तास बसस्थानकांसह नाक्या-नाक्यावर बसची वाट पाहावी लागली. सोमवारी कामावर जाणार्‍या नागरिकांसह प्रवासी व कर्मचार्‍यांना त्यांच्या निश्‍चित स्थळी वेळेत जाता आले नाही. दरम्यान, काहींनी खासगी वाहनांसह मिळेल त्या वाहनाचा आधार घेत वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एसटी महामंडळाने फेर्‍या बंद करण्यापूर्वी प्रवाशांना सूचना करणे अपेक्षित होते, अशी संतापजनक प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.

Exit mobile version