| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी (दि.29) मध्यरात्री 12.30 वाजताच्या दरम्यान खेड-बोरिवली एसटी बसचा अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने समोर असलेल्या बल्कर ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातावेळी बसमध्ये वाहक, चालकासह 31 प्रवासी होते. या अपघातात ट्रक चालकासह बसमधील 12 ते 13 प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
खेड स्थानकातून रात्री 10 वाजता सुटलेली ही बस 12.30 वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात पोहोचली असता हा अपघात घडला. ज्या ठिकाणी ही धडक झाली त्या ठिकाणी एका बाजूला खोल दरी असून बस थोडक्यात दरीत कोसळण्यापासून वाचली. बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच कशेडी आणि पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या घटनेमुळे घाटातील रस्ते सुरक्षा, सुरू असलेली कामे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर स्थानिक नागरिकांनी कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात येत नसल्याची तक्रारही व्यक्त केली आहे.
कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक
