कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन देणे होतेय कठीण
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला दिवाळीच्या हंगामात अतिरिक्त उत्पन्न कमवता आले नाही. दैनंदिन वाहतूक अहवालानुसार, प्रतिदिन सवलतमूल्य रकमेसह प्रवासी तिकिटांमधून मिळणाऱ्या महसुलात तब्बल 6 कोटी रुपयांची तूट आली असून, ऑक्टोबर महिन्यात सुमारे 180 कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती मिळाली आहे.
एसटी महामंडळ ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर धावते. परंतु, प्रत्यक्षात एसटी महामंडळ सातत्याने तोट्यातच आहे. दर महिन्याला आर्थिक टंचाई भासत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन देणे महामंडळाला कठीण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी मिळणाऱ्या निधीवर अवलंबून राहावे लागते. या वर्षी झालेल्या 14.95 टक्के भाडेवाढीचा विचार करता प्रतिदिन सुमारे सरासरी 33 कोटी रुपये उत्पन्न मिळायला हवे होते. परंतु, ऑक्टोबरमध्ये केवळ 26.55 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. म्हणजेत लक्ष्यित केलेल्या रकमेपेक्षा मोठी तूट आली आहे.
निष्क्रिय अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी
एसटी महामंडळाचा संचित तोटा 11 हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असून, दरवर्षी तोटा वाढत आहे. तिकीट विक्रीत घट का होते याचा अभ्यास करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट तातडीने नेमायला हवा. वर्षानुवर्षे एकाच पदावर असलेल्या निष्क्रिय अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी. आवश्यकता भासल्यास त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.







