। मुंबई । प्रतिनिधी ।
ऐन दिवाळीत पुन्हा एकदा एसटी महामंडळ संपावर जाण्याची शक्यता आहे. प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास संप पुकारण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे. एसटी महामंडळाने संप केल्यास सामान्य नागरिकांची दिवाळीत मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल.
तीन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने दिवाळीत संप पुकारला होता. त्याचप्रमाणे या वेळेस शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास हा संप करण्यात येणार आहे. वेतन, भत्ते, 7 वा वेतन आयोग आणि दिवाळी बोनस यांसह विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा कर्मचारी रस्त्यांवर उतरतील, असा इशारा देण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत संप पुकारल्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं. आता जर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर त्याचा मोठा फटका ग्रामीण महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. तसेच शहरातून दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या नागरिकांनादेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असणार आहे.







