कर्जतमध्ये एसटी महामंडळाचा दिखावा

सर्वसामान्य प्रवाशांना प्रवेश बंद; प्रतिक्षालयामध्ये सुविधा नावापुरतीच

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत स्थानकाचा विस्तार सुरु असून, त्या माध्यमातून कर्जत स्थानकात वातानुकिलत प्रतिक्षालय उभे राहिले आहे. व्यवसायिक तत्वावर विकसित करण्यात आलेल्या या प्रतिक्षालयाचे उदघाटन वाणिज्य निरीक्षक यांचे हस्ते करण्यात आले असून, त्या ठिकाणी सर्वसामान्य प्रवाशांना प्रवेश बंद असणार आहे, त्यामुळे कर्जत स्थानकातून दररोज प्रवास करणारे प्रवासी यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.

कर्जत रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा भर प्रवाशांच्या सोयीपेक्षा आर्थिक लाभावर अधिक असल्याचे दिसून येत आहे. स्थानकावरील फलाट क्रमांक एक आणि दोन येथील प्रतिक्षालये व्यावसायिक तत्वावर वातानुकूलित करण्यात आली असून, त्याठिकाणी प्रवेशासाठी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य प्रवाशांना साध्या प्रतिक्षालयांचाही लाभ घेणे अवघड झाले आहे.

एकीकडे प्रवाशांकडून शुल्क आकारून वातानुकूलित प्रतिक्षालये उभारली जात आहेत, तर दुसरीकडे रेल्वे सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या शासकीय रेल्वे पोलीस विभागाची अवस्था मात्र दयनीय आहे. कर्जत रेल्वे स्थानकातील जिआरपी कार्यालय आजही ब्रिटिशकालीन, जिर्ण व असुरक्षित इमारतीत सुरू आहे. पावसाळ्यात गळती, अपुरी जागा, जुनाट संरचना व मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी मात्र कर्जत रेल्वे स्थानकातील आरपीएफ कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले. सुसज्ज कार्यालय, वातानुकूल व आधुनिक सुविधा यामुळे आरपीएफ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रसन्न वातावरणात काम करण्याची संधी मिळाली आहे.

याच रेल्वे प्रशासनाचा दुजाभाव स्थानकावर कार्यरत असलेल्या दोन सुरक्षा यंत्रणांमध्ये असा प्रचंड फरक का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्थानक सौंदर्याकरण आणि व्यावसायिक सुविधा गरजेच्या असल्या तरी प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी पेलणाऱ्या जिआरपी कार्यालयाचे आधुनिकीकरण प्राधान्याने होणे आवश्यक आहे अशी ठाम भूमिका आता प्रवासी संघटनांकडून मांडली जात आहे. जर जिआरपी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक, सुरक्षित व सुसज्ज कार्यालय उपलब्ध करून दिले, तर तणावपूर्ण कामकाजात त्यांना सकारात्मक वातावरण मिळेल आणि त्याचा थेट फायदा प्रवाशांच्या सुरक्षेला व सेवेच्या गुणवत्तेला होईल. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने जिआरपी कार्यालयाच्या नूतनीकरणाचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Exit mobile version