जिल्ह्यातील 658 कर्मचार्‍यांना एसटीचे दार बंद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सुुमारे चार महिन्यांपासून अधिक काळ संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचार्‍यांवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी 1 एप्रिलपासून कडक कारवाईचे संकेत देत 31 मार्चच्या आत पुन्हा हजर होणार्‍यांनाच सेवेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे रायगड परिवहन विभागात आतापर्यंत 1 हजार 658 कर्मचार्‍यांपैकी 1 हजार कर्मचारीच हजर झाले आहेत. त्यानुसार सुमारे 658 कर्मचार्‍यांना आता पुन्हा एसटीच्या सेवेत घेण्यात येणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. या कर्मचार्‍यांसाठी आता एसटीचे दार कायमचे बंद होणार असल्याची माहिती जिल्हा विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे.

रायगड विभागाने जिल्ह्यातील 23 कर्मचार्‍यांना बडतर्फ करुन घरी बसविले होते. तर, 40 जणांची सेवा समाप्त करण्यात आली होती. गेले चार महिने वारंवार आवाहन करुनदेखील अनेक कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने एसटीचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तसेच प्रवाशांनादेखील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचेदेखील मोठे हाल या संपकरी कर्मचार्‍यांच्या अडेलतट्टू भूमिकेने झाले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तसेच शासकीय समितीने विलीनीकरणाबाबत निर्णय दिल्यानंतरही 31 मार्चपर्यंत सेवेवर हजर होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतरही हजर न होणार्‍या कर्मचार्‍यांना परत सेवेत घेण्यात येणार नसल्याचा कडक इशारा देण्यात आला होता.
आतापर्यंत 1 हजार 658 पैकी 1 हजार कर्मचारी हजर झाले असून, जिल्ह्यातील सर्वच डेपातून निम्म्याहून एसटीच्या फेर्‍या सुरु करण्यात प्रशासनाला यश आले आहे. रायगड परिवहन विभागात अलिबाग, पेण, कर्जत, खोपोली, मुरुड, माणगाव, महाड आणि श्रीवर्धन हे आगार कार्यरत आहेत. कर्मचार्‍यांचा संप सुरु झाल्यानंतर सर्वच आगारातील कर्मचारी यात सहभागी झाले होते. प्रशासनाच्या शिष्टाईनंतर पेण, माणगाव, महाड, रोहा, कर्जत तसेच श्रीवर्धन आगारातील कर्मचारी हळूहळू कामावर हजर झाले. त्यामुळे काहीअंशी एसटी वाहतूक सुरु झाली. मात्र, मुरुड आणि अलिबाग आगारातील कर्मचार्‍यांनी आपला हट्ट कायम ठेवत काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्यामुळे या आगारातून जिल्ह्याच्या तुलनेत आतापर्यंत सर्वात कमी एसटी फेर्‍या सुरु होऊ शकल्या होत्या.

परिवहन महामंडळाच्या रायगड विभागातील सर्व आगारातील कर्मचार्‍यांनी 31 मार्चपर्यंत कामावर हजर व्हावे. तातडीने कामावर हजर झालेल्या कर्मचार्‍यांविरोधात कारवाई केली जाणार नव्हती. मात्र, त्यानंतरदेखील जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत, त्यांच्यासाठी एसटीचे दार कामयचे बंद करण्याचे निर्देश परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत. – अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड

Exit mobile version