एसटी चालकाला मारहाण करणार्‍यास सश्रम कारवास

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
एसटी चालकास मारहाण करणे, एका आरोपीला चांगलेच महागात पडले आहे. संदीप सदाशिव माने असे आरोपीचे नाव असून, त्याला अलिबाग सत्र न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि 2 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
ही घटना पेण येथे 17 ऑगस्ट 2016 रोजी घडली होती. फिर्यादी एसटी बस चालक रमेश भानुदास माकणीकर हे मुंबई सेट्रलहून श्रीवर्धनकडे निघाले होते. पेण येथे बाजारपेठे जवळून जात असताना आरोपी माने हे स्कूटी घेऊन रस्त्यात उभे होते. त्यामुळे माकणीकर यांनी गाडी बाजूला घेण्यासाठी बसचा हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने माने यांनी गाडी बस समोर आडवी टाकून, बस चालक माकणीकर यांना बसच्या केबिनमध्ये घुसून शिवीगाळी आणि मारहाण केली होती. प्रवाशांना पुढे घेऊन जाण्यासही अटकाव केला होता.
याप्रकरणी चालक माकणीकर यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यानंतर माने यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि सरकारी कर्मचार्‍याला मारहाण करणे या कलामांसह गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपास करून आरोपीविरोधात अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता स्मिता धुमाळ यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी माकणीकर यांच्यासह बस वाहक, बसमधील प्रवासी, तपासिक अमंलदार आणि आगारप्रमुखांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी माने याला दोषी ठरविले, त्याला एक वर्ष सश्रम कारावास आणि एकूण दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

Exit mobile version