ऐन सणासुदीला लालपरीचा प्रवास बंद

एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा

। मुंबई | वृत्तसंस्था |

वेतन वाढीसह इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी आता राज्यभरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून 9 ऑगस्ट रोजी त्यांच्या मागण्यांसाठी ते संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संपात राज्यातील 13 एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात लाल परीचा प्रवास बंद असणार आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये दीर्घ आंदोलन केले होते. त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण पुरते ठप्प झाले. सलग 54 दिवस सुरू असलेला संप 20 डिसेंबर 2021 रोजी मागे घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र, त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी बेमुदत उपोषणाचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता, वेतनवाढ देण्याचे करारानुसार मान्य केले आहे. पण मागण्यांची पुर्तता करण्याबद्दल पाठपुरावा केल्यानंतरही त्यावर कार्यवाही केली जात नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

'या' आहेत मागण्या
मूळ वेतनात विसंगती असून इतर महामंडळांच्या तुलनेत एसटी कामगारांचे वेतन कमी आहे. त्यामुळे सर्व कामगारांना सरसकट मूळ वेतनात 5 हजार रुपयांची वाढ लागू करावी, आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून घ्याव्या आणि नव्या बसेस उपलब्ध करून द्यावा, सन 2016-2020 या कालावधीसाठी जाहिर केलेल्या रू.4849 कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी तसेच, मनुष्यबळही पुरेसे नसल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने म्हटले आहे.
Exit mobile version