एसटी कर्मचारी निवडणुकीवर टाकणार बहिष्कार

जिल्हाधिकार्‍यांना लवकरच देणार निवेदन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन कामाला लागले आहे. मात्र, जिल्ह्यातील एसटी कर्मचार्‍यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच इतर मागण्यांबाबत फक्त आश्‍वासन देण्याचे काम करण्यात आल्याने ही भूमिका घेतली असल्याचे शिवशक्ती युनियनचे रायगड जिल्हा सचिव प्रसन्न पाटील यांनी दिली.

एसटी महामंडळ रायगड विभागात तीन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यात चालक व वाहकांची संख्या अधिक आहे. रात्रीचा दिवस करून चालक व वाहक प्रवाशांना त्यांच्या निश्‍चित स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे काम करतात. तुटपुंज्या वेतनामध्ये कर्मचारी काम असल्याचे बोलले जात आहे. सुमारे एक लाखहून अधिक प्रवासी प्रवास करीत असून, 35 लाखांहून अधिक एसटीला उत्पन्न मिळते. उत्पन्नवाढीबरोबरच प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळ वेगवेगळे उपक्रम राबवून प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्याच एसटी कर्मचार्‍यांच्या समस्यांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप एसटी कर्मचार्‍यांनी केला आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करावी, त्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करावा, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून एसटी कर्मचारी करीत आहेत. परंतु, सरकारकडून फक्त आश्‍वासने दिली जातात. समिती गठीत करून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे वारंवार आश्‍वासन दिले आहे. मात्र त्याची ठोस अंमलबजावणी करण्यात आली नाही. शासनाला उत्पन्न मिळवून देणार्‍या एसटी महामंडळातील कर्मचारी आजही उपेक्षित आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. रायगड लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या निवडणूक प्रक्रीयेत एसटी कर्मचारी सहभाग घेणार नाहीत. तसेच मतदानावरही बहीष्कार टाकणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

निवडणूकीत नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना केंद्रापर्यंत ने-आण करणेे, ईव्हीएम मशीन व इतर साहित्यांची एसटीतून वाहतूक करणे, अशा अनेक प्रकारची कामे एसटी कर्मचारी करतात. त्यामध्ये चालक व वाहकांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ही कामे एसटी कर्मचारी करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेपासून मतदान न करण्याच्या कर्मचार्‍यांच्या या भूमिकेबाबत जिल्हाधिकार्‍यांना एसटी कर्मचारी निवेदन देणार आहेत. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी यावर काय मार्ग काढणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांची भूमिका कायमच महत्त्वाची राहिली आहे. प्रवासी संख्येपासून एसटीचे उत्पन्न वाढविण्यामध्ये कर्मचार्‍यांचे योगदान राहिले आहे. शासनाला यातून करोडो रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले जाते. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्यात 38 महामंडळं आहेत. यापैकी 32 महामंडळांना सातवा वेतन आयोग देण्यात आला आहे. एसटी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी कायमच राहिली आहे. त्यामुळे येत्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग न घेण्याबरोबरच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले जाणार आहे.

प्रसन्न पाटील, सचिव,
शिवशक्ती युनियन (एसटी कर्मचारी)
Exit mobile version