साईडपट्टी खचल्याने एसटी घसरली

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नवघर येथे रोहा-अलिबाग एसटी रस्त्याची साईडपट्टी खचली असल्याने रस्त्याखाली घसरून चिखलात रुतली. सुदैवाने रस्ता अधिक खोल खचला नसल्याने अपघात टळला. चालकाच्या प्रसंगावधानाने एसटीमधून अलिबागकडे प्रवास करणारे प्रवासी बचावले. अलिबाग-रोहा रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरण करून रस्ता तयार केला जात आहे.

महान डेपोपर्यंत रस्ता रुंदीकरणावर भर दिला आहे. त्याचबरोबर उमटे धरणातून प्रादेशिक पाणी योजना राबविली जात आहे. ही पाणी योजना राबविताना मुख्य रस्त्यालगत किमान आठ फूट खोलीचे खड्डे खणून त्यामधून पाईपलाईन टाकली जात आहे. हे खड्डे खणल्यानंतर त्यावर माती सारून त्या ठिकाणी साईडपट्टी सुस्थितीत केली जात नाही, यामुळे शनिवारी सकाळी रोहा बाजूने अलिबागकडे येणारी एसटी नवघरनजीकच्या परिसरात दुसरे वाहन समोरून आल्याने रस्त्याखाली उतरवली असता एसटी रस्त्यालगतच्या साईडपट्टीमध्ये खचली. सुदैवाने दुर्घटना टळली. थोडा वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. थोड्या वेळाने एसटी बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Exit mobile version