शालेय सहलींतून भरली एसटीची तिजोरी

127 कोटींचे मिळाले विक्रमी उत्पन्न; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी 25 हजार 558 बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक केली. यात तब्बल 127 कोटी 18 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 33 कोटी 29 लाखांनी अधिक असून, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटीशिवाय पर्याय नाही, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

मंत्री सरनाईक म्हणाले की, शैक्षणिक वर्षात विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांकडून सहली आयोजित केल्या जातात. या सहली एसटीच्या माध्यमातून आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून 50 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे एसटीमार्फत आयोजित सहली सुरक्षित, विश्वासार्ह आणि माफक दरात उपलब्ध होतात. विशेषतः ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थींना याचा मोठा लाभ होतो.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाने तब्बल 25 हजार 558 बस फेऱ्या उपलब्ध करून दिल्या. या फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी देत सुरक्षित आणि सुखकर प्रवास केला. या उपक्रमातून महामंडळाला 127 कोटी 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ते मागील वर्षाच्या तुलनेत 33 कोटी 29 लाखांनी अधिक आहे.

यावर्षी बहुतांश शालेय सहलींसाठी एसटीने नव्या आणि अद्ययावत बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि समाधानकारक झाला. तसेच, भविष्यातही शालेय सहलींसाठी एसटी बसेस वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयांनी खासगी बसेसऐवजी एसटी बसेसचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

Exit mobile version