। मुरुड । प्रतिनिधी ।
रेवदंडा -मुरुड रस्त्यावर विहूर गावा नजीक आज शनिवार दि. 27 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि पिकअप यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये पिकअपमधील 13 प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग येथून एसटी बस मुरुड कडे येत असताना पिकअप टेम्पो हा अलिबागच्या दिशेने जात होता. दरम्यान विहूर येथील वाकड्या आंब्याजवळील एका अवघड वळणार गाडीचा ताबा सुटल्याने सदरील पिकअप टेम्पोने एसटीला जोरदार धडक दिली त्यामुळे टेम्पो व एसटीचे मोठे नुकसान होऊन टेम्पो मधील प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत. टेम्पो चालक हा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सदरील टेम्पो मध्ये मजगाव व नांदगाव मधील महिला नवरात्र उत्सव असल्याने मुरुड येथील कोटेशवरी देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन घेतल्यावर ते अलिबाग दिशेने जात असताना विहूर येथे अपघात घडून आला आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुरुड पोलिसांनी तातडीने दखल घेत सदरील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची महत्वपूर्ण भूमिका घेतल्याने जखमींना वेळीच औषधउपचार मिळाले आहेत. टेम्पो मधील 13 प्रवासी जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
