चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी सज्ज

बुधवार व गुरूवारी दोन दिवस पाचशेहून अधिक एसटी बस

| रायगड | प्रमोद जाधव |

सात दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या मार्गावर आहेत. चाकरमान्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एसटी बस सज्ज आहे. बुधवार व गुरुवारी अशी दोन दिवस पाचशेहून अधिक एसटी बसेस मुंबई, ठाणे, बोरीवली येथे जाण्यासाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी दिली.

बाप्पाचे आगमन बुधवारी (दि.27) घरोघरी झाले. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकमानी दाखल झाले होते. आठ दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर चाकरमानी बुधवारी परतीच्या मार्गावर निघणार आहेत. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, रायगड विभागाने नियोजन केले आहे. चाकरमान्यांना मुंबई, ठाणे, बोरीवली, कांदीवली, दादर, परळ येथे जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. विसर्जनानंतर चाकरमानी मुंबई, ठाणे बोरीवलीकडे निघणार आहे. त्यामुळे गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.गर्दीचा विचार करून ग्रुप बुकिंग, आरक्षण नोंदविलेले अशा अनेक प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी सुखरूप पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाने तयारी केली आहे. बुधवारी (दि.3) जिल्ह्यातील बस स्थानकात चाकरमान्यांची गर्दी असणार आहे. त्यानुसार 525 एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. काही चाकरमानी गुरुवारी देखील निघणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.4) दीडशे बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

दुरुस्ती पथकाची नियुक्ती
बुधवारी व गुरुवारी चाकरमानी परतीच्या मार्गावर असणार आहेत. त्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. पाचशेहून अधिक बसेस सोडल्या जाणार आहेत. एसटीचामध्ये बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्तीची सेवादेखील उपलब्ध करण्यात आली आहे. एसटी महामंडळ रायगड विभागामार्फत जिल्ह्यात पाच ठिकाणी दुरुस्ती पथक नियुक्त केले आहे. खारपाडा, पेण, नागोठणे, कोलाड, महाड, या भागात हे पथक नेमण्यात आले आहेत. या पथकामध्ये मॅकेनिक, पर्यवेक्षकांचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात आले.
Exit mobile version