| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
अनेक वर्षे नियमित वेळापत्रकानुसार मार्गस्थ होणाऱ्या खोपट आगाराच्या ठाणे-श्रीवर्धन- बागमांडला एसटी बसचे वेळापत्रक सध्या कोलमडले आहे. तासन्तास खोपट फलाटावर गाडीची वाट बघत उभ्या राहिलेल्या प्रवासीवर्गाच्या रोषाला चालक वाहकाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक नियंत्रक कक्षात चौकशी केली असता प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे स्थानकातून सकाळी अकरा वाजता व बागमांडला येथून सकाळी सात वाजता ठाण्याकडे मार्गस्थ होणाऱ्या या बसचा श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासी तसेच मंडणगड तालुक्यातील बाणकोट,वेश्वी,वेळास येथील प्रवासी वर्गाला फायदा होतो.श्रीवर्धन सह तालुक्यातील हरिहरेश्वर,दिवेआगर ही पर्यटन स्थळे असल्याने पर्यटक ही या बसने प्रवास करतात. खोपट आगाराला ठाणे बागमांडला या बस फेरीत आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. अनेक वर्षे या फेरी साठी खोपट आगाराकडून हिरकणी बस देण्यात येत असे. काही महिन्यांपासून साध्या दरातील सीएनजी बस या मार्गावर देण्यात आली.
अनेकदा अर्ध्या वाटेत सीएनजी संपणे, सीएनजी बस चढावात रखडणे या समस्यांबरोबर बस तीन-चार तास उशिराने सुटणे या समस्यांमुळे प्रवासी त्रस्त झालाय. वाहतूक नियंत्रक कक्षात चौकशी केली असता गाडी वॉशिंगसाठी गेली आहे किंवा सीएनजी भरत आहेत, असे उत्तर खोपट स्थानकातून देण्यात येते. तर चालकाच्या ताब्यात उशिराने बस देणे असे प्रकार घडत आहेत. अनेक वेळी भलत्याच फलाटावर बस लागत असल्याने प्रवासी वर्गाला धावपळ करावी लागते. सोयीस्कर अशी ठरत असणारी ठाणा बागमांडला बस सेवेत खोपट आगाराने सुधारणा करावी, अशी मागणी श्रीवर्धन, म्हसळा व मंडणगड तालुक्यातील प्रवासी करीत आहेत.