शेकापच्या पाठपुराव्याने बोरघरफाटा ते रामराज पर्यंत एसटी सेवा पुर्ववत सुरु

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग – रोहा मार्गावरील बोरघर फाटा ते रामराज या दोन किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे रामराज ते बोरघर फाटा मार्गावरील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्याचा फटका या मार्गावरील शेकडो प्रवाशांना बसला होता. शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून खड्डे भरले. त्यानंतर शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग एस टी आगार प्रमुखांना पत्र देत खड्डे बुजवल्याने त्वरित या मार्गावरील वाहतूक सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार अलिबाग आगारातून बोरघरफाटा ते रामराजपर्यंत एसटी पुन्हा सुरु करण्यात आली. गेल्या महिन्याभरानंतरएसटी सेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेत शेकापला धन्यवाद दिले आहेत.

अलिबाग – रोहा मार्गावरील रामराज हे मुख्य स्थानक असून येथे मोठी बाजारपेठ आहे. रोहा तालुक्यासह अलिबाग तालुक्यातील शेकडो गावांमधील हजारो नागरिक रामराजमध्ये खरेदीसाठी येतात. अलिबाग आगारातून अलिबाग रामराज रोहा, अलिबाग – रामराज, रोहा रामराज मार्गे अलिबाग अशा अनेक बसेस या मार्गावरून सुरु केल्या आहेत. परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून रामराज ते बोरघर फाट्यापर्यंत मोठ मोठे खड्डे पडले होते. या खड्यांमुळे एसटी महामंडळाने बोरघर फाटा ते रामराजपर्यंत एसटी सेवा बंद केली होती. त्याचा फटका येथील बाजारपेठेवर व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना झाला होता. रामराज ते बोरघर फाट्यापर्यंत दोन किलो मीटर प्रवाशांना पायपीट करावी लागली होती. या खड्डेमय रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. शेकापच्या सततच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी रस्त्याची पाहणी करून तात्काळ खड्डे ठेकेदाराद्वारे भरून घेण्यास सुरुवात केली. परंतू 21 जूलैपासून अतिवृष्टी झाल्याने खड्डे बुजविण्याचे काम रखडले होते. पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा खड्डे बूजविण्यात आले. रामराज – बोरघर फाट्यापर्यंतचे खड्डे बुजविल्याने अलिबाग एसटी बस आगाराचे व्यवस्थापक अजय वनारसे यांनी रस्त्याची पाहणी करण्यासाठी कर्मचारी पाठविले. त्यांच्या पाहणीनंतर शनिवारी 7 ऑगस्टपासून बोरघरफाटा ते रामराजपर्यंतची एसटी सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली. एसटी सेवा पुन्हा सुरु झाल्याने या मार्गावरील प्रवाशीवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version