कर्मचारी कमतरतेचा फटका
| महाड | उदय सावंत |
मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड शहरातील एसटी आगाराचे गणित सध्या कोलमडले आहे. महाड एसटी आगाराला मंजूर पदांपेक्षा अनेक पदे रिक्त असल्याने एसटीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या कोलमडलेल्या गणिताला सावरण्यासाठी ऐन गणेशोत्सवात पुरेसा कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या गणेशोत्सवाला कोकणातील लाखो गणेशभक्त आणि चाकरमनी कोकणात दाखल होतात. कोकणात येण्याकरता विशेष गाड्यांची सुविधा केली असली तरी अनेकजण एसटीचाच पर्याय स्वीकारतात. या गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांना परतीच्या प्रवासाला मात्र एसटीच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा सामना करावा लागणार आहे.
महाड एसटी आगारामध्ये निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम एसटीच्या फेऱ्यांवर होत असून अनेक गाड्या रद्द करण्याची वेळ महाड एसटी आगारावर आली आहे. गेले अनेक दिवसांपासून महाड-मुंबई सेंट्रल या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यातच लांब पल्ल्यासाठी जाणाऱ्या गाड्यादेखील बंद ठेवल्या. महाड एसटी आगारांमध्ये चालक, वाहक, सफाई कर्मचारी, वाहतूक निरीक्षक अशा अनेक पदांमधील जागा रिक्त आहेत. गणेशोत्सवामध्ये अशीच परिस्थिती कायम राहिली तर उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण होणार आहे.
गणेशोत्सवामध्ये एसटी महामंडळाच्या आगारांकडून एसटीचे उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. महाड एसटी आगारदेखील यामध्ये मागे नाही. महाड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये समूह आरक्षण करून एसटी बसेस थेट गावातच जाऊन प्रवाशांना मुंबई-पुणे अशा विविध शहरात घेऊन जाते. महाड आगारामध्ये यापूर्वी अनेकवेळा चालक-वाहक आणि इतर कर्मचारी वर्गाची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. आता पुरेशा गाड्या असल्या तरी या गाड्या चालवण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ महाड आगारावर आली आहे. महाड एसटी आगारामध्ये 38 आणि तेवढेच वाहक संख्या रिक्त आहे. महाड एसटी आगारातून 357 लोकल आणि लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू आहेत. या ठिकाणी एसटीने घेतलेल्या 44 खाजगी बसेसच्या फेऱ्या सुरू आहेत. महाड एसटी डेपोकडे यापूर्वी गाड्यांचा तुटवडा जाणवत होता. मात्र आता जवळपास दहा नवीन गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. परिणामी, वाहकांची संख्या कमी असल्याने महाडमधील प्रवाशांना अन्य आगारातील एसटी बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड हे ऐतिहासिक ठिकाण असून या ठिकाणी अद्ययावत सुविधा आणि सुसज्ज असे बस स्थानक असणे गरजेचे होते. मात्र, या ठिकाणी जुन्याच इमारतीवर नवा रंग देऊन लाखो रुपये वाया घालवले जात आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या नवीन बस स्थानकाचे काम देखील अपूर्ण अवस्थेत आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये महाड एसटी आगारामध्ये सर्वाधिक मोठी जागा त्यांच्या ताब्यात आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे महाड एसटी आगार आणि परिसराची वाताहात झाली आहे. त्यातच आगाराच्या मधोमध काँक्रीट काम केल्यामुळे संपूर्ण आगारात पाणी साचून तळ्याचे रूप येत आहे. या ठिकाणी शौचालयदेखील चुकीच्या पद्धतीने बांधलेले आहे.
महाड एसटी आगारातील रिक्त पदांची यादी
चालक, वाहक : 37 पदे रिक्त
पाळी प्रमुख : 3 मंजूर पैकी 3 रिक्त
वाहन परीक्षक : 3 मंजूर पैकी रिक्त 3 रिक्त
टायर फिटर : 2 मंजूर पैकी 2 रिक्त
यांत्रिक : 49 मंजूर पैकी 11 रिक्त
सफाई कामगार : 5 मंजूर पैकी 5 रिक्त
आगार लेखाकार : 1 मंजूर पैकी 1 रिक्त
वरिष्ठ लिपिक : 3 पैकी 2 रिक्त
सहा. वाहतूक निरीक्षक: 1 मंजूर 1 रिक्त
सहा. कार्यशाळा अधिकारी 1 मंजूर 1 रिक्त
काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याने महाड आगाराकडे पुरेसा कर्मचारी असणे गरजेचे आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही याचीदेखील काळजी घेतली पाहिजे. थेट गावातून आणि रेल्वे स्थानकावरून गणेशभक्तांना सोडण्याची व्यवस्था झाली पाहिजे.
कमलेश कोर्पे,
सामाजिक कार्यकर्ता







