अपुरा कर्मचारी वर्ग, प्रवाशांचा प्रचंड संताप
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्यातील शेकडो गावांचा जगण्याचा प्रमुख आधार असलेली एसटी बस सेवा आज गंभीर संकटातून जात आहे. चालक-वाहकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे, डेपोचे वाढते आर्थिक नुकसान आणि त्यातून निर्माण झालेला प्रवाशांचा संताप या सर्वांचा परिणाम म्हणून ग्रामीण जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
निजामपूरसह घरोशी वाडी, करंबेळी, भाले, गांगवली, भिरा, पाटणूस, भागाड, कांदळगाव आदी दुर्गम भागातील नागरिकांची हालचाल फक्त एसटीवर अवलंबून आहे. मात्र, काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्मचारी तुटवड्यामुळे अनेक गाड्या रद्द केल्या जात आहेत. पहाटे बाजारात जाणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थी, कामगार, आजारी लोक सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दीर्घकाळ प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी ॲड. राजीव साबळे, बाबूशेट खानविलकर, नितीन बामगुडे तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा मोठा जमाव माणगाव एसटी आगारात धडकला.
आगार व्यवस्थापक छाया कोळी यांना परिस्थितीची गंभीरता समजावून सांगताना ग्रामस्थांच्या भावना ओसंडून वाहत होत्या. ग्रामस्थांचा आक्रोश बैठकीत जोरदारपणे घुमला. नेत्यांच्या पाठपुराव्यानंतर आगार व्यवस्थापनाने सुरुवातीला 10 कर्मचारी तत्काळ हजर करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया वेगाने सुरू करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची हमी देण्यात आली. सध्या माणगाव आगारात 105 कर्मचारी कार्यरत असून, आणखी 53 कर्मचाऱ्यांची तातडीची गरज आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे आणि आगाराला मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाहतुकीची घडी बसल्याशिवाय ग्रामीण भागाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रवास थांबलेला आहे. आता व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनांना गती मिळते का? ग्रामीण जनतेला दिलासा मिळतो का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण जनता रोजच्या रोज होरपळत असताना निष्क्रियतेचा अधिक कालावधी सहन केला जाणार नाही, असा इशारा नेत्यांनी दिला.
