धनगर समाजाला आवाहन
| बीड | वृत्तसंस्था |
घराघरात मराठा आरक्षण समजावण्यासाठी आम्ही कंबर कसली, तसं तुम्हाला धनगर समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण का, हे अगोदर सांगावं लागेल. जर एकदा धनगराची लाट उसळली तर या देशातील कोणतीच शक्ती आरक्षण देण्यापासून वाचवू शकणार नाही. पण ती कसरत तुम्हाला करावी लागणार. त्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही. धनगर आरक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मनोज जरांगे पाटलांनी धनगर समाजाला दिले. चौंडी येथे आयोजित केलेल्या धनगर मेळावा कार्यक्रमात जरांगे पाटील बोलत होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर समाजानेही आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या अंतिम इशाऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशीच त्यांनी धनगर समाजालाही पेटून उठण्याचे आवाहन केले आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, आपल्या दोघांचं दुखणं एकच आहे. पडलेलं सरकार (विरोधक) म्हणते की मी निवडून आलो की लगेच आरक्षण देतो, मग पडलेलं निवडून आले की दुसरं पडलेलं म्हणतं की चारच दिवसांत देतो. अरे तुमची सत्ता येते केव्हा? आम्हाला किती दिवस फिरवणार? ही जागरूकता आपल्यात येणं महत्त्वाचं आहे. नुसते भाषणं ठोकून उपयोग नाही”.