| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना निवडून आणण्यासाठी छातीचा कोट करून गुहागर विधानसभा मतदारसंघात, संपूर्ण कोकणात गीते यांची ढाल बनून उभा आहे. किमान 50 ते 60 हजार मताधिक्य गीतेंना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आ. भास्कर जाधव यांनी केले.
जाधव पुढे म्हणाले, देशात सुशिक्षित लोकांचे प्रमाण फार मोठे झाले आहे. विरोधकांनी एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे केले आहेत. ते कोणत्या जमान्यात आहेत, तेच कळत नाही. निवडणुकीत निशाणीचा प्रचार केला जातो, नावाचा नाही. याचे भान विरोधकांना असावे. नावाचे उमेदवार उभे केले, तरीही या निवडणुकीत काहीही परिणाम होणार नाही.
देशामध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भारत देश अबाधित राहिला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी सरकार हटाव आणि भारत देश बचाव या भूमिकेतून हे सरकार हटविण्यासाठी या देशातील मतदार सज्ज झाला आहे. त्याचा इंडिया आघाडीला चांगला फायदा होईल. कोकण विशेष करून रायगड हा औद्योगिक जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. जिल्ह्यात अधिक औद्योगिकीकरण वाढविणे, राज्याबाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणे, तरुणांच्या हाताला काम मिळणे, आंबा बागायतदार, मच्छिमारांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, शैक्षणिक, पर्यटन अशा स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे, असेही जाधव म्हणाले.
नरेंद्र मोदी किंवा महाराष्ट्र सरकाच्या जाहिराती जनतेच्या पैशातूनच केल्या जात आहेत. याचा विचार जनतेने करणे आवश्यक आहे. मागच्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने जे बजेट सादर केले, त्यामध्ये एक हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या खिशातील पैशातून आपल्या व पक्षाच्या जाहिराती करायचे, हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा जनताच दाखविणार आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.
पुढे ते राज ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले, राज ठाकरेंबद्दल खूप वाईट वाटत आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल शोकांतिका सुरु आहे. त्याबद्दल अत्यंत्य वेदना होत आहेत. त्यांच्यासारखा चांगला नेता या महाराष्ट्रातून बाद होणे हे अत्यंत वाईट आहे. लहान-मोेठे पक्ष या देशात ठेवायचे नाहीत ही भूमिका भाजपसह अमित शहा यांनी घेतली आहे, त्याची सुरुवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यापासून झाली आहे. तो प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याबाबतही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खंबीर उभे राहिल्याने भाजपला ते शक्य झाले नाही, असेही जाधव यांनी सांगितले.