देशात हर घर दस्तक मोहीम सुरू

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी देशात ङ्गहर घर दस्तकफ अंतर्गत घरोघरी मोफत लसीकरण करण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. या अंतर्गत ज्यांनी एक डोसच घेतला किंवा दोन्ही डोस घेतलेले नाहीत त्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरणाबाबतची माहिती व याचा दैनंदिन आढावा सरकारच्या सर्वोच्च पातळीवरून घेतला जातो आहे. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मागील महिनाअखेरपर्यंत केंद्राकडून आतापावेतो 107 कोटींहून जास्त डोस पुरविण्यात आल्या आहेत. नव्या मोहीमेचा जोर देशातील त्या 48 जिल्ह्यांवर असेल जेथे 50 टक्क्यांहून कमी लसीकरण झाले आहे.
नव्या मोहीमेत संबंधित जिल्हा प्रशासन वैद्यकीय पथक घरोघरी भेट देऊन नागरिकांचे लसीकरण झाले आहे का, किती जणांनी एकही डोस घेतलेला नाही, दुसरा डोस कोणाचा राहिला आहे आदी माहिती घेऊन लस न घेतलेल्या नागरिकांचे घरीच लसीकरण करेल. संपूर्ण लसीकरण न झालेला एकही जिल्हा राहू नये हे केंद्राचे धोरण असल्याचे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी नुकतेच सांगितले होते.
वर्षाच्याअखेरीस संपूर्ण देशाचे कोविड लसीकरण पूर्ण करण्याचा विडा मोदी सरकारने उचलला आहे. मागील महिन्यात देशाने 100 कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा निर्धार पुन्हा बोलून दाखविला होता.
लसीकरण सुरू झाले तेव्हा अनेक शंकाकुशंकांचे काहूर उठवले गेले होते. मात्र देशाच्या जनतेने त्या सार्‍या प्रश्‍नांना उत्तरे दिली आहेत, असा टोला त्यांनी लगावला होता. संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लसीकरणाचा वेग व डोसचा पुरवठा या दोन्ही पातळ्यांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version