डायलिसिस सेंटर सुरु करा

प्रीतम म्हात्रे यांनी दिले पालकमंत्री यांना निवेदन
। पनवेल । वार्ताहर ।
तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसीस सेंटर किडनी शुद्धीकरण केंद्र सुरू करून तज्ज्ञांची निवड करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.
पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करत आहेत. सेंटर सुरू करण्यास काही महिन्यापासून लागणारी उपकरणे देखील येथे बसवण्यात आलेली आहेत. परंतु तज्ञांची निवड करण्यात आली नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रायगड जिल्ह्यातून येथे उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण येत असतात. किडनी आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे खर्चिक असल्याने जिल्ह्यातील रुग्ण दगावण्याची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी केली आहे.
याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता डायलिसिस सेंटर किडनी शुद्धीकरण केंद्र सुरू करून तज्ञाची निवड करण्यासाठीची माहिती घेऊन काम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

Exit mobile version