द्रोणागिरी येथे आरोग्य सेवा केंद्र सुरू करा- प्रीतम म्हात्रे

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात जेएनपीटी, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशाप्रकारे मोठे उद्योग येत आहेत. तेथे येणार्‍या रोजगारासाठीसुद्धा भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. सिडकोच्या माध्यमातून पुष्पकनोड, उलवे, द्रोणागिरी येथे मोठ्या प्रमाणात शहराची निर्मिती करण्यात आली. सिडकोने या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज अशाप्रकारे सुविधा दिल्या आहेत; परंतु तेथील वाढती लोकसंख्या पाहता आजही त्या अपुर्‍या आहेत. याठिकाणी आरोग्य सेवा केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.

ते म्हणाले की, आरोग्याच्या बाबतीत विचार केला असता 50,000 पेक्षा जास्त नागरिक आज द्रोणागिरी नोड मध्ये भारतातील विविध क्षेत्रातून नोकरी निमित्त येथे येऊन रहात आहेत. या ठिकाणी राहणारे नागरिक हे सिडकोच्या माध्यमातून मिळणार्‍या आरोग्य सेवेच्या बाबतीत आजही वंचित आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून आरोग्य सेवा केंद्र सुरू करावे जेणेकरून शासनाच्या सर्व आरोग्य सेवा आणि सुविधा तेथील नागरिकांना मिळतील.

शहरीकरण करताना सिडकोने शहरे वसवली, परंतु अजूनही येथील नागरिकांना मिळणार्‍या सेवा अपुर्‍या आहेत. द्रोणागिरी येथे आरोग्य सेवेबाबतीत अजूनही उपायोजना नाही. द्रोणागिरीत होणारे आरोग्य केंद्र हे सिडकोच्याच माध्यमातून सुरू करण्यात यावे जेणेकरून तेथील नागरिक जो कर सिडकोला देतात त्या मोबदल्यात त्यांना सेवा सुविधा मिळतील.

प्रीतम म्हात्रे,
शेकाप नेते

Exit mobile version