। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ज्या शेतकर्यांचे खरीपमध्ये भात खरेदी करण्यात आलेली नाही, त्या शेतकर्यांचे भात हे रब्बी हंगामामध्ये खरेदीमध्ये समाविष्ट करून त्याचे भात खरेदी करण्यात यावेत व रद्द करण्यात आलेला बोनस सुरू करण्यात यावा, अशी मागणी विशेष उल्लेखाद्वारे आ. जयंत पाटील यांनी केली.
शेतकर्यांनी शेतात तयार केलेल्या भाताची खरेदी करण्याची मुदत ही मार्चपर्यंत होती. परंतु 2021-22 या आर्थिक वर्षात खरीप हंगमातील भात खरेदी करण्यासाठी भात खरेदी केंद्रात शेतकर्यांना सातबारा नोंद करण्याची 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आल्यामुळे अनेक शेतकरी भात खरेदी नोंदी करण्यापासून वंचित राहिलेले आहेत. तर भात खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत करण्यात आल्यामुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. सदर खरेदी केलेल्या भातावर शासनाकडून प्रतिक्विंटलमागे रू.700/- प्रमाणे बोनस म्हणून शेतकर्यांना दिले जात होते. परंतु, सन 2022 या वर्षात सदर बोनस देणे शासनाकडून बंद करण्यात आल्यामुळे शेतकर्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर सभापतींनी निवेदन करण्याचे निर्देश दिले.
रद्द केलेला बोनस सुरु करा – आ. जयंत पाटील
