एनएमएमटी बससेवा तात्काळ सुरु करा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आंदोलनाचा इशारा

| उरण | वार्ताहर |

मागील काही वर्षांपासून उरण तालुक्यात सुरु असलेली एनएमएमटी बससेवा (दि.22) फेब्रुवारी अचानक बंद करण्यात आली आहे. सदरची बससेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.रामचंद्र म्हात्रे यांनी एका निवेदना द्वारे नवीमुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त, एनएम एमटीचे जनरल मॅनेजर यांच्यासह नवीमुंबईचे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. नवीमुंबई महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या प्रवासी बस मागील काही वर्षा पासून कोपरखैरणे व जुईनगर ते उरण शहरासह तालुक्यातील कोप्रोली, वशेणी व पिरकोन या मार्गांवर चालणाऱ्या 30, 31 व 34 क्रमांक असलेल्या एनएमएमटी बस (दि.22) फेब्रुवारी अचानकपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिक व्यवसाय, नोकरी, धंदा, कार्यालयीन व दैनंदिन कामासाठी मुंबई, ठाणे, नवीमुंबईकडे येणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत.

त्याच प्रमाणे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय दहावी, बारावीच्या वार्षिक बोर्ड परीक्षाही सुरु आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर या मार्गांवरील एनएमएमटी बसेवेची सार्वजनिक सुविधा कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना न देता बंद केली आहे, एनएमएमटी तात्काळ सुरु करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने रामचंद्र म्हात्रे यांनी केली आहे. सदरची एनएमएमटी बससेवा तात्काळ सुरु न केल्यास (दि.26) फेब्रुवारी पासून उरण चारफाटा येथे सी. आय.टी.यु. किसानसभा, जनवादी महिला संघटना, डी.वाय.एफ.आय. व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रायगड जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रामचंद्र म्हात्रे यांनी दिला आहे. तसेच यामुळे होणाऱ्या परिणानाची जबाबदारी नवीमुंबई महा नगरपालिकेची राहील, याची नोंद घेऊन प्रवाशी वाहतुक सुरळीत करण्याचे सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version