भोगवटा प्रमाणपत्राअभावी कामोठेमधील पेट्रोल पंप सुरु होण्यास उशीर
| पनवेल ग्रामीण | विशेष प्रतिनिधी |
पेट्रोल भरण्यासाठी दीड-दोन किलोमीटरचे अंतर कपावे लागत असल्याने वसाहतीत पंप असावा ही कामोठेकरांची मागणी होती. कामोठेकरांच्या मागणीची दखल घेत सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिला. मात्र, सिडकोने उपलब्ध करून दिलेला हा भूखंड सरकारी लालफितीच्या कारभारात अडकल्याने पेट्रोल पंपाचे काम पूर्ण होऊनही पंप सुरु होऊ न शकल्याने शेकाप कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या मागणीचा बॅनर पंपावर लावून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
शहरे विकसित करताना सिडकोचे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. कामोठे नोडमधील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. येथील लोकसंख्या तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्याप्रमाणे वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. वाहन चालकांना इंधन भरण्यासाठी कळंबोली, खारघर, खांदा कॉलनी येथील पंपावर जावे लागत आहे. यासाठी वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अमोल शितोळे यांनी या परिस्थितीबाबत राजकीय भाष्य करणारा बॅनर लावून नागरिकांचे लक्ष वेधले आहे. सध्या फक्त ब्युटी पार्लर, साडीची दुकाने, केक शॉपचे उद्घाटन होत आहे. पंधरा वर्षे समस्या जैसे थेच आहे. कामोठेकरांना पेट्रोल पंपाचे उद्घाटन हवे, आता बदल हवा, पनवेलचा आमदार नवा, असा बॅनरवर उल्लेख करून राजकीय विरोधकांवर निशाणा साधला आहे.
सेक्टर 18 भूखंड क्रमांक 4 इथे वर 1099.23 चौ.मी. जागेवर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप बांधून दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पनवेल महानगरपालिकेने भोगवटा प्रमाणपत्र न दिल्याने पेट्रोल पंप सुरू होत नसल्याची चर्चा आहे.