राफ्टिंग सुरू करा, अन्यथा जनआंदोलन छेडू

स्थानिकांचा ठेकेदाराला इशारा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

कोलाड येथे कुंडलिका नदीत सुरु असलेली राफ्टिंग बोट सेवा बंद करण्यात आली आहे. याचा मोठा परिणाम स्थानिकांच्या रोजंदारीवर झाला असल्याने ही सेवा तातडीने सुरु करावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल,असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.

बाराही महिने चालणारी कुंडलिका नदीवरील राफ्टिंग प्रसिद्ध आहे. रिव्हर राफ्टिंगचा साहसी खेळ व थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक इथं दैनंदिन येतात. मौजमस्ती करतात, सुट्टीच्या दिवसात तर स्थानिक व्यवसायांना दुपटीने उभारी मिळते. पर्यटनावर आधारित रोजगाराला यातून चालना मिळते, मात्र आजमितीस ऐन हंगामात येथील राफ्टिंगवर बंदी घालण्यात आली आहे. काही मोजक्या लोकांच्या आडमुठे धोरणामुळे राफ्टिंग व्यवसाय बंद पडलाय. शासनाची ई निविदा प्रक्रिया पूर्ण करून कोलाड रिव्हर राफ्टिंग एलएलपी यांना ठेका मिळाला असूनही काम करू दिले जात नाही. या ना त्या कारणाने अडवणूक केली जाते. हे कुठं तरी थांबले पाहिजे, अशी मागणी कोलाड रिव्हर राफ्टिंग एलएलपी चे ठेकेदार आकाश चौधरी व राकेश शिंदे यांनी केली आहे.

साजे रवाळजे व कामत याठिकाणी राफ्टिंग चालते, नजीकच्या 6 गावातील ग्रामस्थ, तरुण याच रिव्हर राफ्टिंग व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायावर निर्भर असणारा प्रत्येक घटक आज उपासमारीच्या खाईत लोटला गेला. राफ्टिंगवरच बंदी असल्याने नाराज झालेल्या पर्यटकांनी रिव्हर राफ्टिंगक्षेत्र व नजीकच्या पर्यटनस्थळांकडे अक्षरश: पाठ फिरवलीय आहे. राफ्टिंग व्यवसाय सुरू करून स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडवा, अन्यथा व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन छेडू असा इशारा साजे, रवाळजे विभागातील स्थानिक ग्रामस्थ व व्यवसाईक व राफ्टिंग ठेकेदारांनी प्रशासनाला दिला आहे. .

Exit mobile version