लालपरी पुन्हा सुरु करा

कर्मचार्‍यांसह प्रवासीच रस्त्यावर
सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सर्वसामान्य प्रवाशांसाठी लालपरी असणारी एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे दोन महिन्यांपासून आगारातच उभी असल्याने मोठे आर्थिक होत आहे. एसटी कर्मचार्‍यांचा सुरू असलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील गावगाडयावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या गैरसोय आणि कर्मचार्‍यांच्या न्यायहक्कासाठी रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अलिबागमध्ये कर्मचारी आणि प्रवाशांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला. लालपरी पुन्हा सुरू करा आणि महामंडळ शासनात विलनीकरण करून ग्रामीण भागातील गावगाडा पुन्हा बहरू द्या या मागणीसाठी हे उस्फुर्त जनआंदोलन छेडण्यात आले होते.

एसटी विलिनीकरणाबाबत येत्या 5 जानेवारीपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास आक्रमकपणे रस्त्यावर उतरुन संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको केलेजाईल.
दिलीप भोईर,जि.प.सभापती

इशारा दिला. यावेळी आपचे दिलीप जोग, अलिबाग आगारातील वाहतूक परीक्षक दिलीप पालवणकर, वाहतूक नियंत्रक प्रसन्नकुमार पाटील, अर्चना अबू, सचिन मगर, धनश्री घरत, सायली वाणी आदी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर याच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात आदिवासी बांधवासह सर्व सामान्य नागरिक आणि एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांना दिले. एसटी पुन्हा सुरू व्हावी यासाठी दोन महिन्यानंतर पहिलेच राज्यात अलिबागेतील प्रवाशांनी केलेले आंदोलन ठरले आहे.
28 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचार्‍यांनी महामंडळ राज्य शासनात विलनीकरण करा या मागणीसाठी संप पुकारला. त्यामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शासनस्तरावर संप मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संप लवकर मिटेल अशी आशा सर्वसामान्य प्रवाशांना असताना कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दोन महिन्यांपासून संप सुरूच आहे.
मात्र या संपाचा विपरीत परिणाम हा ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात पडला आहे. एसटी संपामुळे सर्वसामन्यांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे. ग्रामीण भागातील गावगाडा संपामुळे कोलमडला आहे. एसटी बंद असल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, कोळी महिला, आदिवासी तसेच सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागत असल्याने अधिकचे भाडे द्यावे लागत आहेत. हातावर कामविणार्‍याचेही एसटी संपामुळे हाल झाले आहेत.
कर्मचार्‍याचा संप मिटेना आणि प्रवाशांना दिलास मिळेना अशी वेळही प्रवाशांवर आली असल्याने अखेर अलिबागकरांनी पुढाकार घेऊन याविरोधात जन आंदोलन केले आहे. अलिबाग शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून हा मोर्चा काढून अलिबाग आगारात आला. त्यानंतर या मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले.

Exit mobile version