अंगठे घेतले, मात्र दोन महिन्यांचे रेशन दिलेच नाही
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील विठ्ठलवाडी या आदिवासीवाडीमधील आदिवासी लोकांना रेशन वेळेवर मिळत नाही. त्यात फेब्रुवारी 2024 मध्ये वाडीमधील सर्व 76 लाभार्थ्यांचे अंगठे पॉस मशीनवर घेण्यात आले आहेत. मात्र, अद्याप धान्य मिळाले नाही, असे आदिवासींचे म्हणणे आहे. दरम्यान, सातत्याने नांदगाव येथील रेशन दुकानदार यांच्याकडून आदिवासी बांधवांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्या रेशन दुकानातून विठ्ठलवाडी गाव हलविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी कर्जत तहसील कार्यालयात अर्जाद्वारे केली आहे.
नांदगाव येथील रास्त धान्य दुकानात विठ्ठलवाडी या गावातील लाभार्थ्यांना समावेश आहे. तेथील 76 लाभार्थी यांना फेब्रुवारी महिन्यात आपल्या घरी बोलावून घेत रास्त धान्य दुकानदार यांनी सर्व लाभार्थी यांचे अंगठे पॉस मशीनमध्ये घेऊन त्यांची नोंद करून घेतली. मात्र, एप्रिल महिना सुरू झाला तरी मागील दोन महिन्यांचे धान्य या लाभार्थी कुटुंबांना मिळाले नाही, असे आदिवासी बांधवांनी सांगितले. याबाबत स्थानिक कातकरी समाजाच्या आदिवासी लोकांनी रेशन दुकानात जाऊन अनेकदा चौकशी केली. मात्र, धान्य देण्याची मागणी केल्यावर रास्त धान्य दुकानदार आदिवासी लोकांवर दादागिरी करतात, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेवटी विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी आपली नेहमीची कैफियत कर्जत येथील जागृत कष्टकरी संघटना यांच्या कानावर घातली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्जत तहसील कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी सदर नांदगाव येथील रास्त धान्य दुकानदार या महिला असून, त्या स्थानिक लाभार्थी यांच्यावर सतत अन्याय करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे जागृत कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि विठ्ठलवाडी ग्रामस्थ यांनी रेशन दुकानदार यांच्या मनमानीबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कमल भोसले, हिरा वाघमारे, शैला मुकणे, काशिनाथ गोसावी यांनी आपल्या वाडीमधील 28 लोकांच्या सह्या घेऊन कर्जत तहसीलदार तसेच पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिले. या वाडीमधील सर्व 76 लाभार्थी हे अंत्योदय योजनेतील लाभार्थी आहेत. त्यांना माणसी दहा किलो गहू आणि 25 किलो तांदूळ दर महिन्याला दिले जातात. मात्र, नांदगाव येथील रास्त धान्य दुकानदार या नेहमी लाभार्थ्यांना गहू कमीच देत असल्याचे आढळून आले आहेत. शेवटच्या वेळी गहू देताना दहा किलोऐवजी पाच किलो गहू दिले आहेत, अशी तक्रार आपल्या अर्जात केली आहे. या तक्रारी अर्जात विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी आपले नांदगाव येथे असलेले रेशन दुकान हलविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. नांदगाव येथील दुकानातून दुकान काढून अन्य जवळच्या गावात जोडण्यात यावे, अशी या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.
विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर कर्जत तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाचे निरीक्षक बी.टी. बुरसे यांनी स्वतः विठ्ठलवाडी येथे कातकरी समाजातील ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी सर्व लाभार्थी ग्रामस्थ यांचे म्हणणे पुरवठा निरीक्षक यांनी ऐकून घेतले आहे.
सदर रेशन दुकानात आपल्याला वेळेवर धान्य मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यांच्या तक्रारीनंतर वाडीमध्ये जाऊन माहिती घेतली असून, रेशन दुकानदार यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि संबंधितप्रकरणी अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. त्याचवेळी अंगठे दिल्यावर तात्काळ सर्वांनी धान्य घ्यायला हवे होते, त्यामुळे धान्य का दिले नव्हते, याची चौकशी केली जाईल. सध्या दुकानात धान्य असून ते धान्य लाभार्थ्यांनी घेऊन जावे, असे सूचित केले आहे.
बी.टी. बुरसे, पुरवठा निरीक्षक
काशिनाथ गोसावी, ग्रामस्थ
पाच वर्षांपूर्वी याच नांदगावमधील रेशन दुकानात असलेले डामसेवाडी गाव हे तेथील ग्रामस्थांनी आवाज उठवून नेहमीचा अन्याय दूर करण्यासाठी हलविण्याची मागणी केली होती. ती मागणी कर्जत पुरवठा शाखा यांनी मान्य केली होती आणि त्याप्रमाणे आमचे गावदेखील नांदगाव रेशन दुकानातून काढावे, अशी आमची मागणी आहे.