बहुरूपींवर उपासमारीची वेळ

| पनवेल | वार्ताहर |

महाराष्ट्रात विविध प्रकारचे जातिवंत असे लोककलावंत आहेत. बहुरूपी हा त्यातीलच एक प्रकार. हे कलाकार कोणाचीही हुबेहूब नक्कल करून सर्वांना आनंद देऊन आपली उपजीविका भागवतात. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक सणांच्या वेळी बहुरूपी येथील आदिवासी संस्कृतीशी संबंधित अनेक प्रकारच्या कला सादर करतात. पूर्वी या कलाकारांना सुगीचे दिवस होते; मात्र आता मोबाईलमुळे ही कला लोप पावत चालली आहे. आज या बहुरूपी कलावंतांचे पोटापाण्याचे हाल होताना दिसत आहे.

बहुरूपी कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली. सध्या काळाच्या ओघात ही बहुरूपी कला लोप पावत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक बहुरूपी कलाकार हे देवी-देवता, पोलीस वेषात बाजारपेठेच्या प्रत्येक दुकानात जाऊन पोलिसी खाक्या दाखवत फिरत असतात. हे कलाकार अगदी लहान वयापासून बहुरूपी म्हणून गावागावांत जातात. वर्षानुवर्षे ज्या गावात जातात, तेथील नागरिकांशी त्यांचे दोन ते तीन पिढ्यांपासूनचे संबंध असते. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत त्यांची ओळख असते. कोणाच्या मुली कोठे दिल्या. ठराविक नागरिकांची सासरवाडी कोठे आहे. काहींच्या बहिणी कोठे दिलेल्या आहेत, आदींबाबतची माहिती बहुरूपी ठेवतात.

सध्या मोबाईलच्या रूपाने करमणुकीची साधने थेट हातात आल्यामुळे बहुरूपी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोलिसांच्या वेशात येणार्‍या या कलावंतांना भामटे व फसवेगिरी करणारे लोक समजून त्यांना जनतेच्या रोषालाही अनेकदा सामोरे जावे लागते. निरनिराळी सोंग करणारी ही बहुरूपी जमात आता काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. परंतु, आजच्या या धावपळीच्या जगातही या कलाकारांनी कला जिवंत ठेवल्याने सार्‍यांनी त्यांचे कौतुक केले. सद्यपरिस्थितीत बहुरूपी कलाकारांना सध्याची पिढी ओळखतही नाही.

Exit mobile version