शेकापच्या वर्धापन दिनाकडे राज्याचे लक्ष

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची भुमीका बजावणार्‍या शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन 2 ऑगस्ट रोजी पेण तालुक्यातील वडखळ येथे मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. या मेळाव्यात सांप्रतच्या राजकारणावर शेतकरी कामगार पक्ष काय भुमीका घेणार आहे याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर होणार्‍या या वर्धापन सोहळ्याला महत्व आले आहे. या निमित्ताने शेकापच्या गावोगावी होत असलेल्या संपर्क बैठकांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाची जोरदार तयारी पक्षाच्यावतीने सुरु आहे. पेण तालुक्यातील वडखळ, येथे 2 ऑगस्टला होणार्‍या वर्धापनदिन सोहळ्यासाठी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते, मंत्री गोपाळ राय, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यासाठी 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यास राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी अवश्य उपस्थित रहावे आणि 3 ऑगस्ट रोजी आपापल्या जिल्हा,तालुका,विभाग,गाव पातळीवर अमृतमहोत्सव साजरा करावा, असे आवाहन कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांनी केले आहे.

शेतकरी कामगार पक्ष हा राज्यातील पुरोगामी विचारांचा एक महत्वपूर्ण पक्ष मानला जातो. चळवळीचा इतिहास असणार्‍या या पक्षाचा रायगड हा बालेकिल्ला आहे. कुटनितीमुळे मागील निवडणूकीत पक्षाचे नुकसान झाले असले तरी पराभवाने न खचलेल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणतीही सत्ता नसताना देखील लॉकडाऊन आणि अतिवृष्टीच्या काळात जनतेसाठी केलेल्या कामामुळे जनतेचा पक्षावरील विश्‍वास मजबूत झाला आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये शेकापक्षाची भुमीका महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षाचे नेते काय भुमिका घेतात याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version