पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

6 लाखाचा दारूसाठा जप्त

| पोलादपूर | शैलेश पालकर |

पोलादपूर तालुक्यातील गोवा बनावटीच्या दारूसाठ्याची आवक नुकतीच छापा मारून राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे. मात्र, यापूर्वी दिविल गावातील एका अवैध दारू तस्करी करणाऱ्याचा मृत्यूचा दाखला गोवा राज्यातील कोर्टात पाठवून सहकार्य करण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथक अलिबाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग महाड यांनी पोलादपूर तालुक्यातील दिवील या ठिकाणी छापा टाकला असता बंद घरामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारुचे 56 बॉक्स विदेशी आढळून आले. या गुन्ह्यातील आरोपी रुपेश मोरे (रा.दिवील,ता.पोलादपूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे.

या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, राज्य उत्पादन शुल्क संचालक प्रसाद सुर्वे, अधीक्षक रविकिरण कोल्हे, विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सतीश गावडे, दुय्यम निरीक्षक रश्मीन समेळ, प्रसाद दाते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती पोकळे, निलेश नाईक, जवान रिंकेश धुळे, कल्याणी ठाकूर, रचना मोहिते, सुनील घन, रणजीत माकोडे यांचा यशस्वी सहभाग होता.

पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून दिवील येथील गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या तस्करी करून मोठया प्रमाणात विक्री केली जात आहे. ग्रामपंचायतही यासाठी करीत असलेल्या सहकार्याबाबत विलक्षण चर्चा असून एका आरोपीविरूध्द गोवा राज्यातील न्यायालयामध्ये हजर राहणे टाळण्यासाठी एका बनावट दारूची तस्करी करताना अटक झालेल्या तरूणास चक्क मृत्यूचा दाखला दिला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version