। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शेतकरी संघटनने दि.27 सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र या संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे.
केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार व कर्मचारी यांच्यावरील अन्यायकारक धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा रायगडचा देखील या आंदोलनाला पाठींबा असेल असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक तसेच राज्य सरकारी, निमसरकारी, जि.प. कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष वि.ह.तेंडूलकर यांनी संयुक्त प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहिर केले.
शेतकर्यांसंदर्भात संसदेत मंजूर झालेले नविन कायदे शेतकर्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत, अशी भावना देशातील शेतकर्यांमध्ये आहे. या विरोधात गेली 10 महिने देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करीत आहेत. इतक्या प्रदीर्घ काळ आंदोलन सुरु असुन देखील केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांबाबत विचार न करता या आंदालनाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे देशातील शेतकरी प्रक्षुब्ध झाला आहे. हा संताप व्यक्त करण्याकरीता देशव्यापी शेतकरी संघटनेने दि.27 सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद आंदोलन पुकारले आहे. या देशव्यापी बंदला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रच्या वतीने जाहीर पाठींबा दिला आहे.