कर्जत-कल्याण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील महत्वाचा असलेल्या कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुभाजक गवताने भरला आहे. दरम्यान, गवत वाढले असल्याने वाहनांसाठी या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. तर, दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या गवताकडे पाहायला वेळ नसल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
या राज्यमार्गावरील कर्जत तालुका हद्दीतील 23 किलोमीटर लांबीचा रस्ता कर्जत सार्वजनिक बांधकाम उप विभागाकडून उरण उप विभागाकडे देण्यात आला आहे. परिणामी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कर्जत तालुक्यात येऊन रस्त्यांची पाहणी करीत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याचा काही भाग हा डांबरी तर काही भाग आरसीसी काँक्रिटपासून बनविला गेला आहे. 12 वर्षे या रस्त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून बनविण्यात आला होता. त्यात कर्जत-चारफाटा पासून वडवलीपर्यंत काँक्रीटचा रस्ता तर वडवलीपासून शेलूपर्यंतचा भाग डांबरी बनविला गेला होता. रस्त्याचा काही मीटर भाग वगळता अन्य सर्व रस्ता दुभाजक टाकून दुपदरी बनविण्यात आला आहे.
आता हाच दुपदरी रस्ता वाहनचालक यांच्यासाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील कर्जत आशाने फाटा येथून डिकसळ यांच्यावेळी चिंचवली गाव येथून नेरळ पेट्रोलपंप या भागातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजक हा पावसाळ्यात उगवलेल्या गवताने भरले आहेत. नेरळ विद्या मंदिरपासून पुढे शेलू आणि ठाणे जिल्हा हद्दीपर्यंत असलेल्या दुपदरी रस्त्यावर दुभाजक गवताने भरले आहेत. या दुभाजकांमध्ये वाढलेले गवत हे माणसाच्या उंचीचे झाले आहे. त्यामुळे मधोमध वाढलेल्या गवतामुळे समोरून येणारी वाहने दिसून येत नाहीत. तसेच, येथील दुभाजकामधून अचानक येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची भीती वाढली आहे. या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उरण उप विभाग यांच्याकडे आहे. मात्र, उरण उपविभागामधील अधिकारी हे कर्जत नेरळ रस्त्यावर पाहणी करायला येत नाहीत. त्याचवेळी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल देखील कोणी अधिकारी येत नाहीत, अशी वाहनचालक आणि स्थानिकांची तक्रार आहे.







