प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा

पीएनपी पाष्टी हायस्कूलच्या नवोपक्रमाला यश
विनयकुमार सोनवणेंनी पटकावला द्वितीय क्रमांक


| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रायगड यांच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांच्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2023-2024 चे आयोजन करण्यात आले होते. दि. 2 जानेवारी पनवेल येथे या दोन्ही गटाची नवोपक्रम सादरीकरण दुसरी फेरी संपन्न झाली. यात माध्यमिक शिक्षक गटातून पीएनपी माध्यमिक शाळेचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक विनयकुमार सोनवणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्था रायगडचे प्राचार्य डॉ. सुभाष महाजन, प्रा. तुपे, अधिव्याख्याता तथा गटशिक्षण अधिकारी संतोष दौड, प्रा. पाटील यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. पहिल्याच वेळेस राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नवीन वर्षाला यशाने सलामी देऊन शाळेला अजून एक गोड भेट सोनवणे यांनी दिली आहे. या वर्षात त्यांनी पीएनपी संस्था तसेच शाळेचा असाच नावलौकिक वाढवावा, अशी भावना मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी व्यक्त केली.

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी या यशाबद्दल सोनवणे यांचे व आठवीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, राज्यस्तरीय सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन शांताराम कांबळे, सरपंच चंद्रकांत पवार, राजाराम धुमाळ, राजाराम दिवेकर, प्रकाश लाड, जगजीवन लाड, श्रीपत मनवे यांनीदेखील या यशाबद्दल सोनवणे आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पीएनपी माध्यमिक शाळा पाष्टी ही तालुक्यातील प्रेरणादायी शाळा आहे, नक्कीच भविष्यात शाळा आणखी खूप मोठी भरारी घेईल, असा विश्वास म्हसळा गटसमन्वयक जनाब कौचाली आणि म्हसळा गटशिक्षणाधिकारी संतोष दौड यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version