। माणगाव । सलीम शेख ।
महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात रविवारी (दि. 15) माणगाव येथील शिक्षिका मधुरा मंगेश पालांडे यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरीबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मधुरा पालांडे या गेली अनेक वर्षे शिवाजीराव पाटील शिक्षक संघाच्या आजी व सदस्य म्हणून माणगाव तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात काम करीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देऊन त्यांना घडविण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. याचबरोबर शासनाच्या लोकोपयोगी योजनांची, अभियानांची माहिती गावातील ग्रामस्थांना देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शिक्षक पॅनलने सन 2021-22 या वर्षातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार मधुरा मंगेश पालांडे यांना अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे येथे झालेल्या भव्यदिव्य सोहळ्यात प्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, शिक्षक आ.विक्रम काळे, पदवीधर आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र शिक्षक पॅनल प्रमुख श्री.चामे, श्री.कोळी इत्यादींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे शिवाजीराव पाटील शिक्षक संघ माणगाव यांनी विशेष अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.







