| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालीत (दि.18) डिसेंबरपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धा 13 वर्षांपासून अविरत पणे सुरू आहेत. येथील ग. बा. वडेर हायस्कुल पालीच्या भव्य रंगमंचावर या स्पर्धा होणार आहेत. जनता या स्पर्धेवर प्रेम करते.
जनतेला या एकांकिका स्पर्धेची ओढ लागलेली असते. त्यामुळे या स्पर्धेचे सात दिवस जणू पालीत व जल्लोष पहावयास मिळत आहे. स्पर्धेच्या उद्घाटनास सिने अभिनेते व विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचा समारोप व बक्षिस समारंभ (दि.24) डिसेंबर रोजी होणार आहे. समारोपावेळी नाट्यरसिकांना पाहण्यासाठी एक दर्जेदार नाटक मोफत असणार आहे. या स्पर्धामुळे पाली गावचे नाव राज्य व देशपातळीवर मोठ्या उंचीवर गेले आहे. पालीतील स्पर्धेत सादरीकरण करणाऱ्या कलाकारांनी पुढे अनेक टिव्ही मालिका व चित्रपट सृष्टीत पदार्पण करुन आपल्या प्रतिभेने अभिनय क्षेत्रात छाप पाडली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव यांनी दिली.
यावर्षी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. तसेच सुधागड तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या चार ते पाच समाजसेवकांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दरवर्षी नव्या रुपात व नव्या संकल्पनेतून साकारल्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, आदींसह राज्यातील तसेच गोव्यातील एकांकिका संघ व सहभागी होणार आहेत. एकांकिका स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या एकांकिका संघाला 1 लाख रुपये व आकर्षक चषक, द्वीतीय क्रमांकास 75 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकास 50 हजार रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ किंवा लक्षवेधी क्रमांकास 25 हजार रुपये व आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या एकांकिका संघाला स्वतंत्रपणे 15 हजार रुपये व आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच वैयक्तीक अभिनयाकरीता प्रोत्साहनपर पारितोषिक दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी वेत्रवान गुरव 9028592090, अभिजीत चांदोरकर, 8983713769, शरद निकुंभ 8408930365 यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले. यावेळी वेत्रवान गुरव, अभिजित चांदोरकर, शरद निकुंभ, सचिन मोरे, विक्रम काटकर, सुहास लोखंडे, शेखर राऊत, सुशील शिंदे, आशिष हजारे, ऋषिकेश पिंपळे, मिलिंद सातूर्डेकर, दत्ता सावंत आदींसह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
गेल्या 13 वर्षांपासून प्रतिष्ठानने रंगभूमीच्या संवर्धनासाठी घेतलेला हा पुढाकार म्हणजेच नाट्यप्रेमींसाठी दरवर्षीची सांस्कृतिक पर्वणी बनली आहे. रात्री उशिरापर्यंत रंगणारे नाट्यप्रयोग, उत्साही प्रेक्षकांची उपस्थिती आणि नवोदित कलाकारांचा जोश या साऱ्यांनी पालीची एकांकिका स्पर्धा राज्याच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेतील अविभाज्य ठरली आहे.
-शरद निकुंभ,
सचिव







