| कर्जत | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन आयोजित कोंकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉवर लिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचा कर्जतमध्ये शुभारंभ करण्यात आला. ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय व आंरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सहभाग आहे. तसेच, महिला स्पर्धकांची आणि जेष्ठ स्पर्धकांची विशेष उपस्थिती आहे. एकूण 225 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष व कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी युवासेना कर्जत-खालापूर विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे, प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर आदी उपस्थित होते. गिरीश वेदक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी महेंद्र घरत यांनी ‘कबड्डी, क्रिकेट आदी मैदानी खेळ सर्व ठिकाणी नेहमीच खेळले जातात. पॉवर लिफ्टिंगसारखे खेळ क्वचितच खेळताना दिसतात. अशा प्रकारच्या स्पर्धा नेहमीच आयोजित करण्यात आल्या तर त्यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मैदाने वाचविणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मैदाने शोधावी लागतील’, असे सांगितले. प्रसाद थोरवे यांनी, ‘कोंकण ज्ञानपीठ संस्था थोड्या अडचणीत आहे. ती पुन्हा यशाच्या शिखरावर आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक आले आहेत. अशा स्पर्धा ग्रामीण भागात करणे गरजेचे आहे. या स्पर्धांसाठी लागेल ते सहकार्य आम्ही करू’ असा शब्द दिला.
त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. पंच म्हणून राजहंस मेंहदळे, प्रशांत सरदेसाई, अनंत चाळके, सूर्यकांत गद्रे, समीर दळवी, गोपीनाथ पवार, संजय शर्मा, अंकुश सावंत, विशाल मुळये, सुरेश धुळप, मुरली जोशी, गिरीश गिंडी, मनीष कोंढरा हे काम पहात आहेत. याप्रसंगी प्रा. राजकुमार नारखेडे, प्रा. संजय पाटील, प्रा. शब्बीर कर्जतवाला, प्रा. विजय खरचे, प्रा. विकास पाटील, प्रा. सुनील सोनार, संजय लाड, वाहिद शेख, किरण पाटील, सुनील लाड, अनिल घरत, मंगेश वझरेकर, निश्चल शिंदे, सचिन मनवे, गजानन लाड आदींसह शिक्षक, विद्यार्थी व क्रीडा रसिक उपस्थित होते.