| उरण | प्रतिनिधी |
मासेमारी बोटी वादळी वाऱ्यात भरकटल्याने आणि वारंवार येणाऱ्या संकटांमुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या काळात संकटात असलेल्या बोटींशी संपर्क साधण्यासाठी या बोटींवर ट्रान्सपाँडर बसविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या बोटींना सहकार्य करता येणार आहे.
वादळ, सागरी आपत्ती, दिशा भरकटणे, आग लागणे अशा अनेक प्रसंगांत मच्छीमार बोटीला तात्काळ मदत मिळावी, यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मत्स्य विभागामार्फत सुरू केलेल्या या मोहिमेला मच्छीमारांनी प्रतिसाद दिला आहे. अरबी समुद्रालगत असलेल्या उरण तालुक्यातील मोरा, करंजा, दिघोडे, आवरेसमवेत अनेक गावांतील रहिवासी हे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात असतात. गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत उरण तालुक्यातील छोट्या-मोठ्या अशा सर्वच मासेमारी बोटींवर हे ट्रान्सपाँडर बसविण्यात येत आहेत.
मत्स्य विभागामार्फत मोफत सुविधा
यामध्ये उरण तालुक्यातील सागरमित्रांच्या मदतीने हे उपकरण बसविण्यात येत असून मोरा हद्दीतील सुमारे 80 ते 90 मच्छीमार बोटींना यामुळे सुरक्षा मिळाली आहे. करंजा हद्दीतील सुमारे 150 पेक्षा अधिक बोटींवर कार्यान्वित करण्यात आले असल्याचे सागरमित्र स्वस्तिक कोळी याने सांगितले आहे. तर, उरण तालुक्यात सुमारे 400 पेक्षा अधिक मच्छीमार बोटींवर हे ट्रान्सपाँडर बसविण्यात आले असल्याची माहिती सागरमित्र अलिशा नाखवा यांनी दिली. मोरा येथील बोटींवर बसविण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे. तर, मत्स्य व्यवसाय विभागामार्फत देण्यात येणारे हे ट्रान्सपाँडर हे नि:शुल्क आहेत. त्याची अंदाजे किंमत ही सुमारे पंचवीस हजार असल्याचे सांगण्यात आले आहे.







