इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर निर्णय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इस्त्रायलमध्ये स्टेट ऑफ वॉरची घोषणा करण्यात आली आहे. गाझा स्ट्रिपमधून हमासच्या दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा स्ट्रिपमधून इस्त्रायली भागावर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु केले होते.

इस्त्रायलवर अनेक रॉकेट डागण्यात आले. तसेच अनेक दहशतवादी इस्त्रायलच्या भूमीत शिरले होते. त्यानंतर इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून ‘स्टेट ऑफ वॉर’ची घोषणा करण्यात आलीये. दोन तासांमध्ये गाझा स्ट्रिपमधून तब्बल 5 हजार रॉकेट डागल्याचे बोलले जाते. देशाच्या दक्षिणेत आणि मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. लोकांना घराच्या बाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गाझा स्ट्रिपच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. त्यामुळे हमास दहशतवादी संघटना आणि इस्त्रायल लष्करामध्ये संघर्ष होण्याची स्थिती आहे.

इस्त्रायलचे लष्कर मोठी योजना आखत असल्याची माहीती समोर येत आहे. इस्त्रायलकडून सांगण्यात आलंय की, ‘गाझा स्ट्रिपमध्ये हमास दहशतवादी संस्था कार्यरत आहे. देशावर जे हल्ले झाले त्यासाठी ही संघटनाच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील.’ इस्त्रायलचे सैन्य हमास दहशतवाद्यांसोबत तीव्र संघर्ष सुरु करणार आहे.

Exit mobile version