अलिबागमध्ये उद्यापासून राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

अभिजित त्रिपणकर, काजल कुमारी यांना अग्र मानांकन

| अलिबाग | प्रतिनिधी |

कमळ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दि. 27 ते 29 या कालावधीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा पुरुष व महिला एकेरी पद्धतीने खेळली जाणार आहे. पुरुष गटात पुण्याच्या अभिजित त्रिपणकर तर महिला गटात मुंबईच्या काजल कुमारी यांना अग्र मानांकन देण्यात आले आहे. कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीशचंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र कॅरम असोसिअशनचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा कॅरम असोसिअशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यावेळी उपस्थित होते.

क्षात्र्येक्य समाज हॉल, कुरुळ-अलिबाग येथे ही स्पर्धा खेळवली जाणर आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनने या स्पर्धेला मान्यता दिली आहे. दि.27 रोजी सकाळी 10 वाजता रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील पुरुष व महिला एकूण 218 सहभागी होणार आहेत. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडा शौकिनांना मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने 1 लाख 10 हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था कमळ पतसंस्थेकडून केली जाणार आहे. या स्पर्धेतील महत्वांच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या बनविण्यात आल्या आहेत. स्पर्धेचे तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सतीशचंद्र पाटील यांनी दिली. आंतरराष्ट्रीय पंच परविंदर सिंग यांची प्रमुख पंच म्हणून तर आंतर राष्ट्रीय पंच आशिष बागकर यांची सहाय्य्क प्रमुख पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तांत्रिक संचालकपदी आंतर राष्ट्रीय पंच अजित सावंत यांची नियुक्ती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केली आहे, असे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष व रायगड डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी सांगितले.

स्पर्धेतील मानांकने
पुरुष एकेरीः 1) अभिजित त्रिपणकर (पुणे), 2) विकास धारिया (मुंबई), 3) झैद फारुकी (ठाणे ), 4) रहिम खान (पुणे ), 5) पंकज पवार (मुंबई), 6) कुणाल राऊत ( मुंबई), 7) गिरीश तांबे (मुंबई), 8) योगेश धोंगडे (मुंबई).
महिला एकेरीः 1) काजल कुमारी ( मुंबई), 2) अंबिका हरिथ (मुंबई), 3) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), 4) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), 5) सिमरन शिंदे (मुंबई), 6) श्रुती सोनावणे (पालघर), 7) आकांक्षा कदम (रत्नागिरी), 8) मेधा मठकरी (पुणे).
Exit mobile version