राज्यातील पाणी ग्राहकांना मिळणार ‘अभय’

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा
माथेरानकरांकडून सातत्याने पाठपुरावा

| माथेरान | वार्ताहर |

राज्यात कुठेही नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दर आहेत. घरगुती वापरासाठी एक हजार लीटरमागे रु. 24, तर व्यावसायिक वापरासाठी रु.150 पर्यंतचे दर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आकारते. यासाठी माथेरानकरांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी संबंधित अधिकार्‍यांशी भेटीगाठी घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची माथेरानमध्ये पाणीपुरवठा योजना असून, नेरळ-जुमापट्टी, वॉटर पाईप या ठिकाणाहून पम्पिंग करून माथेरानमध्ये पाणी पुरवठा केला जातो. तीन ठिकाणी होणार्‍या पम्पिंग मुळे माथेरानमध्ये इतर ठिकाणपेक्षा अतिरिक्त जास्तीचे दर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा भुर्दंड सोसावा लागतो. पाण्याचे दर कमी असावे, दरवाढ करू नये तसेच थकीत बिलधारकांना व्याज माफ करून मुद्दल रक्कम भरण्यासाठी अभय योजना सुरू करावी, योजनेचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी सातत्याने मागणी करत होतो. त्याच अनुषंगाने आज पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांसाठी माथेरानच्या मागणीच्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्रात अभय योजना लागू करण्याची घोषणा केली.


याबाबतचे पत्र नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांना त्यांच्या मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय बंगल्यावर पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केले. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीमध्ये पर्यटनावर विपरित परिणाम झाला असल्या कारणाने सर्वसामान्य लॉजधारकांना आणि थकीत बिल असलेल्या सर्वसामान्य माथेरानकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. माथेरान नवीन पाणी योजनेचा आढावा घेण्यासाठी आणि इतर समस्या जाणून घेण्यासाठी पुढील महिन्यात माथेरानच्या दौर्‍याचे नियोजन करू, असे आश्‍वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

Exit mobile version